Sunday, March 29, 2020

साथीचे रोग

निसर्गाशी प्रतारणा, जीवनाशी खेळ
‘‘कभी जो ़ख्वाब था वो पा लिया है
मगर जो खो गई वो चीज़ क्या थी’’
सर्वांगिण प्रगतीचे जे स्वप्न उभ्या मानवजातीचे होते ते साकार होत असताना आपल्याकडून हरवत गेलेली सामाजिक व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व त्यांच्या असंतुलनाने उद्भवणारे प्रश्‍न कोणते याचा विचार करावयास लावणारी आजची परिस्थिती, जागतिक आरोग्य संघटनेची (थकज) पुर्नरचना होणे गरजेची याचा पुर्नविचार किंबहुना प्रतिपादन सध्या अमेरिकेचे पंतप्रधान ट्रम्प व भारताचे पंतप्रधान मोदी करत आहे. जगाची आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची आजच्या इतकी असहाय्य (बेबस) अवस्था कधीही झाली नव्हती. चीन निर्मित कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर संपूर्ण वाताहत झालेले इटली, फ्रान्स, स्पेन सारख्या युरोपियन देशानंतर भारताचा क्रमांक लागेल किंवा नाही याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळेेल परंतु भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या देशातील तमाम नागरिकांनी सरकारने जाहिर केलेले लॉकडाऊनचे पालन केले तरच या देशातील नागरिक सुजान व देशप्रेमी आहे यावर शिक्कामोर्तब होईल. परंतु सद्यस्थितीत संपूर्ण जगाला जे काही भोगावे लागत आहे त्याची पाळेमुळे निश्‍चित आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणांशी संबंधित आहे हे विसरून चालणार नाही. ती समस्त मानवप्राण्यांची कहाणीच होय.
ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी
तू घडलास कसा?
मुठभर होतास संख्येने
लाखभर वर्षांमध्ये आठेक अब्ज झालास
दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो संस्कृती
अनेक धर्म, अनेक जाती-जमाती
अगणित तंत्र आणि शास्त्र
नैसर्गिक विविधता व विपूलता
हे ‘एका’च अनेक होणं ही तुझी कहाणी
अनेक प्रश्‍न सोडवत इथपर्यंत आलास
दर पावलाला नवे प्रश्‍न उत्पन्न केलेस
‘माणुसकी’ म्हणजे काय?
अमानूषता कशात असते
पदोपदी या प्रश्‍नांना सामोरा जातो आहेस
कधी जाणीवपूर्वक अनेकदा अजाणताच
पाहा तर, 
ही छोटीशी कालानुरुप तयार केलेली
स्वत:ची कहाणी - उत्तर शोधायला
मानवी विकास, विज्ञानाची प्रगती या बाबी निसर्ग किंवा पर्यावरण यांपासून कधीही अलिप्त राहिलेल्या नाहीत. त्यांचा एकमेकांवर चांगला वाईट परिणाम सातत्यानं होत आलेला आहे. जागतिक तापमानाच्या समस्येनं मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मानवी अस्तित्वाचा हा प्रवास आणखी वेगवान होण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीमधील विकास व त्यातील संशोधनाचे टप्पे महत्वाची भूमिका बजावत असतानाच ज्यावेळी निसर्गानं मानवी हस्तक्षेपाचे परिणाम म्हणून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या त्या वेळी अशा हस्तक्षेपांना नियंत्रित न करता प्रतिक्रिया नियंत्रित करण्याचा प्रयत्न मानवी र्‍हासाला कारणीभूत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण अनेक रोग आणि विकारांवर मात केली असं म्हणतो. प्रत्यक्षात मात्र अशा रोग आणि विकारांची लक्षणं किंवा विकारांचं स्वरुप फक्त बदललं आहे असचं म्हणावं लागेल. विविध आजाराच्या नियंत्रणासाठी प्रतिजैविके , स्टिरॉईडस व इतर औषधाची निर्मिती निरंतर चालू आहे. ज्या डासांमुळे मलेरिया किंवा इन्फ्लूएंझा पसरतो त्यांचे नियंत्रण करताना क्लोरोक्विन, सल्फोनामाईड, आमाइडोक्विन यासारख्या औषधांचा वापर करून डासांची प्रतिकारशक्तिच आपण अजाणतेपणे वाढवीत चाललो आहोत. असचं काही अनेक आजारांबाबत घडत आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण निसर्गामध्ये वेगवेगळे नवनवे जंतू आणि विषाणू सोडत आहोत की, ज्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं याची यंत्रणा आज जगाकडे नाही. (कोरोना हे एक ताजे उदाहरण) 
आजपर्यंत मानवाने साथीचे रोग पाहिले ते विशिष्ट हवामानात किंवा विशिष्ट अवस्थेमध्ये पसरल्याचे मानवाला माहित आहे परंतु सार्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू आणि आताचा कोविड 19 यांनी वैश्‍विक संक्रमणाचा संदेश दिलेला आहे. तो समस्त मानव जातीला नष्ट करण्यासाठीच आहे. आपली पिके, आपली आहार पद्धती, आपली जीवन पद्धती या सर्वांतून आपण निसर्गालाच आव्हान देतो आहोत. जेनेटिक इंजिनिअरींग या तंत्रामध्ये मानवाचा विकास आणि नाश दोन्हीही सामावलेले आहे. एखाद्या आजाराचं कारण आणि आजाराचं मूळ शोधून काढून त्यामध्ये बदल करण्याची क्षमता मानवाच्या हाती आली आहे आणि या बदलातूनच नवनवे विकारही निर्माण झाले किंवा आपणच तयार करत आहोत, जैविक विज्ञान, जेनेटिक इंजिनिअरींग अशा विषयांवर सातत्याने चर्चा घडविणार्‍या एका व्यासपीठाने तर या वैज्ञानिक प्रगतीच वर्णन मानवाचा हिरोशीमाकडे सुरू असलेला प्रवास असे केलेेले होतं. परंतु कोविडमुळे माझ्या मते मानवजमातीचा समूळ नाश होण्याकरीता मानवानेच टाकलेले हे पाऊल आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. मानवी इतिहासाचा वेध घेतला तर असे काही विकार एकविसाव्या पिढीतील मानवाला अस्वस्थ करून टाकतील त्यामध्ये पृथ्वीवर वाढणारे लोकसंख्येचे ओझं, शहरांमध्ये वाढणारी अनियंत्रित गर्दी ही कोणत्याही रोगाला आमंत्रण देणारीच ठरेल. जगाच्या विविध कानाकोपर्‍यात मोठमोठ्या झोपडपट्यांमध्ये जवळजवळ 100-120 कोटी लोक राहतात. त्यांच्या आरोग्याची नीटशी व्यवस्था नाही किंवा त्यांना सकस आहार देण्याची क्षमता नाही. अशा परिस्थितीत भारत, पाकिस्तान सारखे प्रगतशील व इतर मागासलेले देशातील शहराची शहर लॉकडाऊन किती दिवस करता येतील याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. 
वाढत्या  लोकसंख्येच्या गरजेपोटी सुरू झालेल्या हायब्रीड अन्नोत्पादनाने अनेक प्रश्‍न निर्माण केले आहे. पेस्टिसाईड व रासायनिक खतांच्या  बेसुमार वापरामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणार्‍या निकस अन्नधान्य व फळेभाजीपाला उत्पन्नामुळे प्राणीजन्य अन्न सेवनाचे प्रमाण वाढले, त्यामुळे श्‍वसनयंत्रणा, त्वचारोग, कॅन्सर, डायबेटीस सारख्या रोगांबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळ जवळ 118 विविध प्रकारचे अ‍ॅटोइम्युनिटी सिंड्रोम असलेले आजार बळावत चालले आहेत. त्याची तीव्रता शहरांमधील विविध हॉस्पिटलमध्ये पेशंटची वाढलेली संख्याच सर्व काही सांगून जाते.
इंधन आणि बाजार : दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने आर्थिक महासत्ता होण्यासाठी जगभरामध्ये इराण, इराक, इस्त्रायल, सौदी अरेबिया, रशिया, भारत, पाक, उत्तर व दक्षिण कोरिया, व्हिएतनाम यासारख्या देशांना कायमस्वरूपीच्या युद्धझळामध्ये गुंतवून ठेवून इंधनाचा बेसूमार वापर केलेला आहे. त्यामुळे चीन, कोरिया व मोडकळीस आलेल्या सोव्हिएत युनियन यांच्या कम्युनिस्ट विचारांची औद्योगिक मक्तेदारी, साम्राज्यवाद व मुक्त अर्थव्यवस्था व भांडवलशाहीचा उगम होतानाच  प्रदुषित जल,  हवा व जमिनीमधून काढण्यात येणार्‍या इंधनाने निसर्गाचा समतोल पुर्णपणे बिघडला आहे. गेली पन्नास साठ वर्षांमध्ये समुद्राच्या वरच्या 300 मीटर भागातले पाणी 0.2 अंश से. तर पृष्ठभागाचे तापमान 0.4 ते 0.8 अंश से. ने वाढल्यामुळे सागरी जीवसृष्टीच्या र्‍हासाबरोबरच जलावरण-हिमावरण (चक्रीवादळे, सुनामी, महापूर, पर्वतीय हिमनद्या वितळण्याच्या प्रमाणात वाढ) सारखे प्रश्‍न उद्भवत आहे, उत्सर्जित वायुचे वाढलेले प्रमाण त्याच्या प्रतिबंधासाठी केलेले आतंरराष्ट्रीय कायदे व नियम अमेरिका, चीनसारख्या व काही युरोपियन राष्ट्रांनी पायदळी तुडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या युद्धाच्या माध्यमातून आपली दादागिरीचे दर्शन घडविले आहे. 
जगाची वाढ तशीींळलरश्र पद्धतीने होत असताना त्यास भारतसुद्धा अपवाद नाही. विविध संस्कृतीचे, औद्योगिक प्रगतीचे टप्पे ओलांडताना भारताची माध्यमांच्या नजरेतून तयार केलेली अभासी प्रतिमा ही एक फसवणूकच आहे.
भारतामध्ये धार्मिक छळवादाची नवीन संकल्पना समाजामध्ये रुढ होत आहे. त्याचे हिडीस प्रदर्शन माध्यमांमध्ये व हिंदू व मुस्लिम धर्मप्रेमींमध्ये पेरले जात आहे. धर्मोपदेश करणारे नवनवे संप्रदाय रोज निर्माण होत आहे. गाय, गोबर, मनुस्मृती, प्रखर इस्लाम मुलतत्ववादसारख्या विषयांमधून धर्माधर्मात व समाजासमाजामध्ये अंतर पडत आहे. संप्रदाय व त्यांच्या प्रमुख सद्गुरुंचे स्तोम  माजविण्यासाठी सर्व प्रसारमाध्यम सरकारांच्या माध्यमातून प्रभावीपणे वापरली जात आहे. अक्षरश: मोजदाद अशक्य व्हावी एवढा या संप्रदायाचा आपल्या समाजात सुळसूळाट झालेला आहे. खेड्यांतून नव्हे सध्या शहरातून ही लोक हुरळेल्या मेंढीनं लांडग्याच्या मागं लागावं तस या नव्या धर्मावताराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. अनेकजण तर त्या ‘अवतारी’ मंडळीच्या संमोहनाने भारले जाऊन आपल्या इस्टेटी, शेतजमीनीही त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टांच्या झोळीत टाकत आहे. धार्मिकतेला एवढं अभूतपूर्व उधाण का आलं हे दैववादी समाजापुढील सर्वात मोठ आव्हान आहे. दुसरं असं की जे आमचे मुलभूत सामाजिक व आर्थिक प्रश्‍न आहेत त्याची उत्तरं या धार्मिक जागृतीतून कदापि मिळणार नाही अस असतानाही भारतातील कुटुंबव्यवस्था आरोग्य व सामाजिक प्रदुषणाच्या विळख्यात आहे. आर्थिकस्थिती जेमतेम असताना राजकीय व सामाजिक मोठपण सिद्ध करण्यासाठी भव्यदिव्य सण, निवडणुकांमध्ये मग्न असलेली जनता, लग्न समारंभ, अध्यात्म गुरुचे मेळावे त्यातील अमर्यादित जेवणावळी, ग्रंथपठणाचे सोपस्कार पाडाण्यात मग्न आहे. परंतु संपूर्ण समाज जीवनाची वाताहत झाल्याने समाजात मानसिक पसरलेली रोगट आणि आत्मकेंद्रीत व्यक्तीवाद त्यातून सतत जाणवणारी असहाय्यता सर्वकाही विचारांच्या पलीकडे.
सार्वजनिक आरोग्याची तर ऐसी तैशी हे पुन्हा एकदा कोविडमुळे सिद्ध झाले. युद्धासाठी अण्वस्त्रांची तर आता गरज उरलेलीच नाही. आता फक्त वाटा शोधाव्या लागतील. समृद्ध व शाश्‍वत जीवनाच्या. कारण भारतीय समाजामध्ये समाजजीवनाची अंग वेगवेगळी आहेत म्हणून शाश्‍वत विकासासाठी अनुरुप जीवनशैली स्वीकारणे हेच ध्येय असले पाहिजे. कारण मानवनिर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच असतात. आज हजारो मृत्यू होत आहेत. निसर्गाने कोणताही धर्म, वर्ण, जात, देश, गरीब, श्रीमंत दाखविला नाही. सर्वकाही गतीविरहित जगणं आणि त्या जगण्यासाठी धडपड. 
चीनच्या विषाणूमुळे आज सर्व जग चीनला दोषी ठरवत आहे. परंतु ग्लोबल ट्रेडींगच्या नावाखाली संपूर्ण जगाने चीनने उत्पादीत केलेल्या सुईपासून ऑटोमोबाईल्स, सिमेंट, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिकवस्तु, फर्निचर, वस्त्र, मोबाईल, फार्मास्युटीकल्स, खते यासारख्या विविध वस्तुंची बाजारपेठ जगातील अनेक देशांमधील खेड्यापाड्यांमध्ये उभी केली. पर्यटनव्यवसायाच्या नावाखाली तर तथाकथित हौशे, नवशे व आर्थिक समृद्धी प्राप्त झालेल्यांनी तर हैदोसच मांडला होता. आपल्या भौगोलिक व जीवनाचा स्तर किंवा उंची याचा विसर पडत असताना परदेशी प्रवास व त्याद्वारे चंगळवादाला मिळणारे प्रोत्साहन हे स्टेटसचे प्रतिक झाले होते. त्याच्या जाहिराती म्हणजे दररोजच्या वर्तमानपत्राची एक अभूतपूर्व अशी मेजवाणी व सामान्यांना लालसेमध्ये गुंतवून ठेवणारी एक साखळी कार्यरत आहे.
रॉयल सोसायटी ऑफ लंडन या विज्ञानातील सर्वात मोठ्या अन् मान्यताप्राप्त संस्थेचे अध्यक्ष लॉर्ड मार्टिन रीच यांच्या शब्दात सांगायच तर हे शतक मानवाचे अखेरेचे शतक आहे. त्याचं अस्तित्वच आज धोक्यात आलेलं आहे. गेल्या शतकातील विज्ञानाच्या वेगवान प्रगतीचा हा परिणाम आहे. आता आपण अशा उंचीवर पोहोचलो आहोत की, तेथून खाली उतरायचं कसं हे कळेनासं झालं आहे. विकासाच्या वाटेवरून आज विनाशाच्या दिशेनं प्रवास सुरू झालाय आणि तोही वेगानं होतोय. अखेरची घंटा ऐकायची असेल तर पर्यावरणाचा विचार प्राधान्याने करावा लागेल. ओझोनच्या थराला पडलेलं भगदाड, ग्रीन गॅसचे परिणाम, वाढते तापमान, वाढते प्रदुषण अशा विविध लेबल्सने या समस्या जगाबरोबर भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविधतेने परिपूर्ण असलेल्या या देशामध्ये सर्वकाही शक्य आहे. त्यासाठी संकल्प हवा, पर्यावरण संरक्षणाचा व त्यामाध्यमातून सार्वजनिक आरोग्य जपण्याचा...

No comments:

Post a Comment

नमस्कार मी सौरभ काकडे Blog creator. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आपण comment नक्की करा काही सूचना देखील सांगू शकता. आपल्याला ब्लॉग आवडला तर ह्या ब्लॉग बद्दल आपल्या जवळच्या व्यक्तींना जरूर सांगा.
धन्यवाद